
दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांची नजिकच्या भविष्यात वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. शहरात भूमिगत रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रस्तावित उपक्रमांतर्गत मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेन स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-2) यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील दाब कमी होईल. अवजड वाहनांची हालचाल भुयारी रस्त्याद्वारे वळवण्यात येणार असल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. सुमारे 70 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या माध्यमातून रस्ते आणि मेट्रो यांना पूरक एकत्रित वाहतूक नेटवर्क तयार केले जाणार असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.



























































