मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुती आमने-सामने

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही शिंदे गटाला  माघार घ्यावी लागली आहे. शिंदे गटाने विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदारसंघातील आपला  उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुती आमने-सामने आहे.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी येत्या 26 जूनला मतदान  होत आहे.

अनिल परब विरुद्ध किरण शेलार

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत यांनी भाजपच्या दबावामुळे माघार घेतली. आता मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे अॅड. अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होईल.

अजित पवार विरुद्ध भाजप

मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे येथे भाजपचे शिवनाथ दराडे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज. मो. अभ्यंकर आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे यांच्यात लढत होईल. मुंबई शिक्षकमधून काँग्रेसच्या प्रकाश सोनवणे यांनी माघार घेतली.

भाजपच्या दबावामुळे शिंदेंची माघार

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे यांच्यासाठी शिंदे गटाच्या संजय मोरे यांना माघार घ्यावी लागली. कोकण पदवीधरमधून शिवसेनेचे किशोर जैन यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमित सरैया यांनी माघार घेतली. त्यामुळे निरंजन डावखरे व काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होईल.

नाशिकमध्ये तिरंगी लढत

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संदीप गोपाळराव गुळवे, महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. काँगेसचे दिलीप बापुराव पाटील, अपक्ष राजेंद्र विखे-पाटील यांच्यासह पंधरा जणांनी आज माघार घेतली. यामुळे निवडणूक रिंगणात आता 21 उमेदवार आहेत.