
महाशिवरात्रीनिमित्त उद्या, रविवारी मुंबईतील मंदिरांमध्ये विविध धार्मिक, सांस्पृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्तोत्र पठण, रुद्राभिषेक, सुस्वर भजन अशा कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल असणार आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मुंबईनगरी भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे.
ताडदेवमध्ये सुस्वर भजन
ताडदेव एम. पी. मिल्स कंपाऊंड येथील शिवमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारीला तांबळवाडी ग्रामस्थ भजनी मंडळाचे सुस्वर भजन, 16 फेब्रुवारीला ह.भ.प. सरला आळंदीकर तर 17 फेब्रुवारीला ह.भ.प. चकोर वाबिस्कर महाराज यांचे कीर्तन होईल. 18 फेब्रुवारीला ह.भ.प. उद्धव पवार महाराज यांचे तर 19 फेब्रुवारीला पृष्णा महाराज दराडे यांचे कीर्तन होईल. 20 फेब्रुवारीला ह.भ.प भक्ती पालवे यांचे तर 21 फेब्रुवारीला विद्या पवार यांचे कीर्तन होईल. 22 फेब्रुवारी रोजी जयश्री गावडे यांचे काल्याचे कीर्तन होईल, अशी माहिती अध्यक्ष अरविंद बने यांनी दिली.
मेघनाथ सेवा मंडळातर्फे शिवनामाचा जयजयकार
जोगेश्वरी पूर्व येथील मेघनाथ सेवा मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मेघवाडी मेघनाथ मंदिर येथे हा महाशिवरात्री उत्सव पार पडणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी शिवलिंग अभिषेक, शिवनामाचा जयजयकार, महाशिवरात्री उत्सव व भाविकांना दूध वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली.
अंधेरीत स्वरसंध्या
अंधेरी पश्चिम श्री स्वामी समर्थ नगर येथील श्री शिव गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने उद्या, रविवारी महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे 6.30 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी 6.30 वाजता योगेश केळवेकर निर्मित मराठी-हिंदी गीतांचा स्वरसंध्या हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मिलिंद दळवी, उपाध्यक्ष अरुण सावंत यांनी दिली.
जोगेश्वरीत भजन रजनी
जोगेश्वरी पूर्व सरस्वती बाग येथील श्री रामेश्वर मंदिर संस्थान यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 8.30 वाजता रुद्राभिषेक, रात्री 9 वाजता रंगपूजा आणि आरती होणार आहे. रात्री 9.30 वाजता भजन रजनी होणार असून श्री रामेश्वर भजन मंडळी, श्री स्वामी समर्थ मठ भजनी मंडळ तसेच जोगेश्वरीतील इतर नामवंत भजनी मंडळातर्फे भजन आमि भक्तीगीतांचे सादरीकरण होणार आहे. सोमवारी सकाळी 6.30 वाजता श्री च्या देवळाभोवती पालखी सोहळा आणि प्रसाद वाटप होईल.
























































