मुंबई ते मनमाड राज्यराणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत: परभणी ते मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचा प्रस्ताव

130

सामना प्रतिनिधी । नांदेड

दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने मराठवाड्यासाठी दोन वेगवेगळ्या गाड्या सोडण्याचा निर्णय जवळपास पूर्ण झाला असून मुंबई ते मनमाड राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत तर केवळ सहा दिवस असलेली नांदेड-पनवेल गाडी येत्या १ जानेवारीपासून आठवड्यातून सातही दिवस धावणार आहे. यासोबतच परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला असून, मुदखेड ते परभणी या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी काल रात्री पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

नगरसोल ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम त्यांच्या प्रमुख नियंत्रणाखाली करण्यात आला. नांदेड स्थानकावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना विनोदकुमार यादव म्हणाले की, जानेवारी २०१९ पासून नांदेडहून मुंबईसाठी आणखी एक रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. सध्या मुंबईहून मनमाड पर्यंत धावणारी राज्य राणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत आणण्याचा प्रस्ताव नाशिककरांनी विरोध केल्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होता. परंतू आता हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येत्या जानेवारी पासून राज्य राणी एक्सप्रेस नांदेडहून धावणार आहे. मुंबई तसेच नांदेडहून रात्री १० वाजता नांदेड ही गाडी सुटेल. या गाडीला सहा वातानुकूलित डबे राहतील. याशिवाय नांदेड-पनवेल आठवड्यातून सातही दिवस धावणार आहे. सचखंड एक्सप्रेसच्या तिसऱ्या गाडीला देखील नवीन डबे लावण्यात येत आहेत. नांदेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले असून येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

परभणी-मुदखेड मार्गाचे दुहेरीकरणाचे काम येत्या मार्च-एप्रिल पर्यंत तसेच मनमाड झोनमधील मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. परभणी-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाचा सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकउे गेला असून येत्या अर्थसंकल्पात या कामाला मंजुरी मिळेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गेल्या दोन वर्षात पायाभूत सुविधांचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या कार्यकाळात यासाठी अधिकचा निधी प्राप्त झाला आहे.

रेल्वेच्या सुरक्षाविषयक बाबींना वार्षिक तपासणीत अधिक महत्व देण्यात येते. नांदेड विभागात रेलवे मार्गाच्या सुरक्षेबाबत चांगली काळजी घेतली जात आहे. प्रवासी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधीशी देखील प्रशासनाचा चांगला संवाद आहे. त्यामुळे अनेक चांगल्या सुचना प्राप्त होतात. रेल्वेच्या थांब्यासाठी या विभागातून अधिकच्या मागण्या आहेत. परंतू लांब पल्ल्याच्या गाड्या लहान स्थानकावर थांबवता येत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्य राणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढविण्याच्या तसेच नांदेड-पनवेल दररोज सोडण्याच्या निर्णयाचे माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष रामनारायण काबरा यांनी स्वागत केले आहे. मराठवाडा एक्सप्रेससाठी प्लॅटफॉर्मचा प्रश्न तसेच डबल डेकर चालवण्याची मागणी रेल्वे संघर्ष समितीचे शंतनू डोईफोडे यांनी विनोदकुमार यादव यांच्याकडे केली. उमाकांत जोशी यांनी तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रायलसीमा एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढविण्याची आणि नांदेड-मनमाड व नांदेड-आदिलाबाद दरम्यान डेमो गाडी चालविण्याची मागणी केली. उमरीचे पारसमल दर्डा यांनी नगरसोल-नरसापूर गाडीला उमरी येथे थांबा देण्याची मागणी केली तसेच पत्रकारांनी मागणी केली की, दिवाळी तसेच नाताळ व उन्हाळी सुट्यामध्ये नांदेडहून पुण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात यावे.

आपली प्रतिक्रिया द्या