कसारा घाटात आज मोठा अनर्थ टळला. मुंबईहून नाशिक येथे निघालेली ट्रॅव्हल्सची खासगी बस अंबा पॉइंटजवळ रस्त्याच्या कडेला पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात अडकली. यानंतर चालकाने करकचून ब्रेक दाबल्यानंतरही उतारामुळे बस दरीच्या दिशेने घसरू लागली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी एकच कल्लोळ करत देवाचा धावा केला. सुदैवाने ही बस तुटलेल्या लोखंडी रेलिंगला अडकताच प्रवाशांनी एकामागोमाग एक बसमधून उड्या मारल्याने 40 प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आले. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही घाटातील रस्त्याची पुरेवाट लागली असून सरकारच्या लाडक्या कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारणार कधी, असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
महामार्गावरील कसारा घाटात अंबा पॉइंटजवळ रस्ता खचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या खचलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही त्याचे काम पूर्ण झालेले नाही. याच ठिकाणी ही बस आली असता गाडीचे मागील दोन्ही चाक या खड्ड्यात अडकले. त्यामुळे बसला मोठा धक्का बसला. चार फुटांवरच दरी असल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवून करकचून ब्रेक दाबला, परंतु निसरडा रस्ता यामुळे बस दरीच्या दिशेने घसरू लागली. घसरणारी बस तुटलेल्या लोखंडी रेलिंगला अडकल्याने मोठा अपघात टळला. त्यानंतर बसमधील चाळीस प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर उड्या मारल्या. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य शरद काळे, देवा वाघ, जसविंदर सिंग, बाळू मांगे, रफिक शेख यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दरम्यान कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश चौधरी, पोलीस हवालदार माळी, महामार्ग पोलीस घोटी केंद्रचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येत घाटातील वाहतूककोंडी सुरळीत केली.
किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल?
दोन वर्षांपासून दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. कोट्यवधींचा चुराडा करूनही घाटातील काम तडीस लागत नाही. या भोंगळ कारभाराने अनेकदा अपघात होत आहेत. असे असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या भयंकर प्रकाराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल, असा संताप व्यक्त होत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.