मुंबईत निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन कामगारांचा मृत्यू

मुंबईत निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. मालाड पूर्वमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये दोन ते तीन कामगार जखमीही झाले असून त्यांना उपचारांसाठी मालाडच्या एम.डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. मलाड पूर्वला गोविंद नगर येथील हाजी बाबू रोडवर बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळला.

ही एसआरएची इमारत असून या दुर्घटनेमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर अन्य एकाला ऑर्थोपडिक वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.