
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांनी मराठी भाषा दिनी एक पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत टीकात्मक वक्तव्य केले होते. ती टीका म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या नियमावलीचा भंग असल्याचे म्हणत विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत पवार यांच्याविरोधात स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र युवासेनेसह अनेक सिनेट सदस्यांनी तो प्रस्ताव विद्यापीठाच्या कामकाजाशी किंवा विद्यार्थीहिताशी निगडीत नसल्याचे सांगत मागे घेण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला तो मागे घ्यावा लागला.
युवासेनेतून सिनेट सदस्यपदी निवडून आलेल्या आणि नंतर भाजपात प्रवेश केलेल्या शीतल शेठ यांनी तो प्रस्ताव मांडला होता; परंतु तो मागे घ्यावा लागल्याने त्यांची नामुष्की झाली. शेठ यांनी पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.



























































