
मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्रदूषणाचा कहर अनुभवला. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 200 अंकांवर पोहोचला. प्रदूषणात अचानक मोठी वाढ होऊन हवेची गुणवत्ता ढासळली. त्यामुळे नागरिकांची घुसमट झाली. विशेषतः वृद्ध नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना असह्य त्रास झाला. पुढील काही दिवस शहरातील प्रदूषण चिंता वाढवणारे असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
शहरात मागील अनेक दिवस थंडी मुक्कामी आहे. किमान तापमान 20 अंशांच्या आसपास नोंद होत आहे. पहाटे आल्हाददायी वातावरणाचा अनुभव घेणाऱया मुंबईकरांना घराबाहेर पडल्यानंतर प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. शहराचा एक्यूआय वारंवार धडकी भरवत आहे. रविवारी प्रदूषण आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असलेल्या पातळीवर पोहोचले. एक्यूआय थेट 200 अंकांवर झेपावल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 7.34 वाजता केलेल्या रिअल-टाइम निरीक्षणातून हवेतील सूक्ष्म कणांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सूक्ष्म कण हवेची गुणवत्ता बिघडण्यास सर्वात गंभीर कारण ठरले. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शहरातील पीएम-2.5 कणांची घनता 119 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली होती, तर पीएम-10 कणांची पातळी 151 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली. या दोन्ही पातळी सुरक्षा मानकांपेक्षा खूप जास्त होत्या. त्याचा श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना अधिक त्रास झाला. पुढील काही दिवस प्रदूषण उच्च पातळीवर राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
मास्क घाला, मोकळय़ा हवेत व्यायाम टाळा!
वाढत्या प्रदूषणाचे सूक्ष्म कण श्वसनसंस्थेमध्ये खोलवर प्रवेश करतात. ते रक्तप्रवाहात पोहोचू शकतात. त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण तसेच इतर दीर्घकालीन आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. संभाव्य धोका लक्षात घेत ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी अतिरिक्त खबरदारी घ्यावी, त्यांनी बाहेर फिरताना मास्क घालावा, मोकळय़ा हवेतील व्यायाम टाळावा, असे आवाहन तज्ञांनी केले आहे. पीएम-2.5 आणि पीएम-10 या सूक्ष्म कणांच्या उच्च पातळीमुळे जळजळ, खोकला, थकवा आणि श्वसनाच्या समस्या वाढण्याची भीती आहे.






























































