मुंब्र्याच्या खाडीकिनारी कचऱ्यात सापडले अडीचशे मतदान कार्ड, व्हिडीओ व्हायरल

 

मुंब्र्याच्या रेतीबंदर खाडी परिसरात सुमारे अडीचशे मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गणेशघाटाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही ओरिजनल मतदान कार्ड सापडली. एवढी मतदान कार्ड नेमकी आली कुठून? ती कोणाची आहेत? या मतदान कार्डाचा वापर दुबार मतदानासाठी केला आहे का, असा सवाल मुब्रावासीयांनी केला आहे.

रेतीबंदर येथील गणेशघाट परिसरात गणेशोत्सवानिमित्त साफसफाईचे काम सुरू असताना तेथील कर्मचाऱ्यांना कचऱ्यात मतदान ओळख पत्रांचा खच सापडला. याबाबत माहिती मिळताच काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गणेशघाट परिसरात धाव घेत या कार्डाचा फोटो आणि व्हिडीओ तयार केले. या सर्व कार्डाची तपासणी केली असता हे कार्ड कळवा परिसरातील असल्याचे समोर आले आहे.

कार्डावरील नंबर मतदार यादीतील नावे यात तफावत
मतदान कार्डावरील पत्त्यांचा शोध घेत असताना यांच्या हाती 72 क्रमांकाची यादी हाती लागली. या यादीत नमूद केलेल्या मतदारांची नावे आणि त्यासमोर लिहिलेल्या पत्त्यांमध्ये तफावत असून यादीतील नावांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मतदार यादीतदेखील फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्या यादीतील इमारती आणि पत्त्यांचा माहिती ही चुकीची असल्याचा आरोप करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी तक्रार नोंदवणार असल्याची माहिती नीलेश पाटील यांनी दिली.

रेतीबंदर परिसरात गणेशोत्सवानिमित्त साफसफाई सुरू असताना त्या ठिकाणी ओरिजनल वोटर आयडी मिळाले. कळवामधील कार्ड असल्याचे समोर आली आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असून निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणार आहे. वसीम सय्यद (मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष, काँग्रेस)