
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेटचा दिवस आला तरी महायुती की आघाडी याचा निर्णय राज्यातील बहुतांश ठिकाणी झालेला नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याचे टाळून थेट पक्षाचा एबी फॉम देत उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. यामुळे उमेदवारीच्या आशेवर असणाऱ्या अनेकांनी ऐनवेळी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उडय़ा मारत तिकीट पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. पक्ष कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून नाराजीला मोकळी वाट करून दिली. तिकिटासाठी लफडे करून काही हाती न लागल्याने बंड पुकारण्यास सुरुवात केली आहे. फॉर्मात आलेल्या या बंडोबांमुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार अडचणीत येऊ नये यासाठी मनधरणी आणि धनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून पक्ष की अपक्ष याचा फैसला होणार आहे.
राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महायुती करून महानगरपालिका निवडणुका लढण्याचे जाहीर केले होते. पण, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी कोण कुठे लढणार याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. मुंबइत दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात असले तरी काही जागांवरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आल्यानंतर महायुतीच्या इच्छुकांमधील असंतोष उफाळून येण्यास सुरुवात झाली असून काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. तर काहीजणांनी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपकडून दिनकर पाटील, फरांदे यांच्या मुलाचा अर्ज दाखल
चार दिवसांपूर्वी मनसेतून भाजपमध्ये आलेल्या दिनकर पाटील यांना भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध होत असतानाही त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य आणि आमदार सीमा हिरे यांचा दिर योगेश हिरे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाशिकमध्ये पक्षांतर्गत राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
ठाण्यात शिंदे गटाचे इच्छुक शिवसेनेच्या संपर्कात
ठाणे महापालिकेच्या जागांवरून भाजप-शिंदे गटात शेवटच्या क्षणापर्यंत घासाघीस सुरू आहे. यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून उमेदवारी मिळेल की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. याच कारणामुळे शिंदे गटातील अनेकजण शिवसेनेशी संपर्क साधू लागले आहेत. अनेक प्रभागात नाराजीनाटय सूरू असून भाजपमध्येही अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांनी अन्य मार्गांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कल्याण–डोंबिवलीत महायुतामध्ये बंडाची बिजे
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गट आणि भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याने इच्छुकांची धाकधूक सुरू झाली आहे. त्यातील काहींनी तर पक्षांने कारवाई केली तरी चालेल पण आम्ही महापालिका निवडणूक लढवणारच असल्याचा आक्रमक पवित्रा थेट बंडाची तयारी सुरू केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोकेदुखी चांगलीच वाढली असून बंडोंबाना कसे शांत करायचे याच्या विचारात महायुतीचे नेते पडले आहेत.
भाजपच्या सुरेखा पाटील बंडाच्या तयारीत
मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 27 मधून माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांना डावलत भाजपने निलम गुरव यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या सुरेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या एका भावनिक फेसबुक पोस्टमध्ये अन्याय किती मोठा असला तरी मी लढणार, असे सांगत बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
नाराजांची खदखद आणि उडय़ा
पुण्यात भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. तिकीट नाकारल्याने दोन दिवसांत पाच माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
ठाण्यात शिंदे गट आणि भाजपात घासाघीस सुरू असून या गोंधळामुळे शिंदे गटातील अनेक इच्छुक शिवसेनेला संपर्क साधू लागले आहेत. भाजपमध्येही अशीच अस्वस्थता आहे.
छत्रपती संभाजीनगरात शिंदे समर्थकांनी ‘भाजपचा नाद सोडा… युती तोडा’ अशा घोषणा देत आपली खदखद व्यक्त केली.
शिंदे गटाला मतदान केल्यास स्वर्गात जाणार!
महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला मतदान केल्यास तुम्ही स्वर्गात जाल. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्यालाच स्वर्गात जागा आहे, विरोधकांना मत दिल्यास तुमचे काही खरे नाही, असे अजब विधान शिंदे गटाचे ‘काय झाडी, काय डोंगार’ फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथील सभेत बोलताना केले.
मुंबईत महायुतीत 20 जागांचा तिढा
महायुतीत भाजप आणि शिंदे गटात 20 जागांचा तिढा अद्यापही कायम असून बंडखोरीच्या धास्तीने दोन्ही पक्षांकडून अंतिम निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिंदे गटाला 90 जागा. तर भाजपच्या 137 जागा निश्चित झाल्या आहेत. मात्र यातील 20 जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून जागांची अदलाबदल किंवा उमेदवारांची अदलाबदल झाल्यास काय परिणाम होतील याचा अंदाज दोन्ही बाजुंकडून घेतला जात आहे. त्यामुळे उद्यापर्यंत इच्छुक गॅसवर राहणार आहेत.
66 जणांची यादी जाहीर – मुंबईत भाजपकडून पहिल्या लिस्टमध्ये दीड डझनहून अधिक अमराठी उमेदवार
पटेल, त्रिवेदी, गाला, शर्मा, कनोजिया, पुरोहित यांना संधी
पुण्यात शिवसेना, काँग्रेस, मनसेची आघाडी पक्की
पुणे महापालिकेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि मनसेसह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी पक्की झाली आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसला 60 जागा तर शिवसेनेला 45 जागांचे वाटप अंतिम झाले आहे. त्या जागांवरील उमेदवारांना दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिले आहेत.
दिग्गजांचा पत्ता कट – नागपूरमध्ये भाकरी फिरवली; फडणवीसांचे धक्कातंत्र
तीन-चार टर्म नगरसेवक राहिलेल्यांना भाजपने घरी बसवले
‘राजा’मुळे निष्ठावंत नाराज, भाजप कार्यालयात राडा
धारावीच्या वॉर्ड क्रमांक 185 मधून रमेश नाडकर इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या नाडकर यांनी कार्यकर्त्यांसह थेट भाजपच्या दादर येथील कार्यालयात धडक दिली. तिथे धरणे आंदोलन करत त्यांनी घोषणाबाजी केली.
मीरा–भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, नाशिकमध्ये युती फिस्कटली
मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि नवी मुंबई महापालिकेत शिंदे गट व भाजपची महायुती फिस्कटली आहे. सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरलेला असतानाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे दोन्ही गटांनी सर्वच प्रभागातील आपल्या इच्छुकांना आज एबी फॉर्मचे वाटप करून युती फिस्कटल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले. दरम्यान, नाशिकमध्ये भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिंदे गटाने अजित पवार गटाशी हातमिळवणी केली.

































































