मनपाची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांची मोर्चेबांधणी

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांत मोर्चेबांधणीला वेग आला आहे. इच्छूक उमेदवारांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आपली दावेदारी रेटली आहे. राजकीय पक्षांची कार्यालयेही इच्छुकांच्या गर्दीने फुलू लागली आहेत. त्यात राजकीय पक्षांनी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नेत्यांच्या आश्वासनाची वाट न पाहाता इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज भरून आपणही निवडणुकीच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे.

महापालिका निवडणुकीची लगबग झाली आहे. निवडणुकीचा माहोलही तयार होऊ लागला आहे. इच्छूक दावेदारांनी आत्तापासून प्रभागात ठाण मांडले आहे. नेत्यांकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराआधी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी सोशल मीडियाचाही जोरदार वापर केला जात आहे. प्रभागातही कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. माजी नगरसेवकांनी पूर्वी मंजूर कामांची उद्घाटने, भूमिपूजनावर जोर दिला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले असून, इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वी काही इच्छुकांनी उमेदवारी निश्चितीसाठी धडपड सुरू केली आहे. पक्षासमोर आपले नाव पुढे राहावे, यासाठी इच्छुकांनी जोरदार मोहीम उघडली आहे. प्रभागात पोस्टर, बॅनर, सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडत आहे. पक्षाचे नेते, पदाधिकाऱयांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळांकडून नेत्यांवर दबाव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवारीसाठी ‘सेटिंग मोहीम’ हाती घेतली आहे.