
मनाई आदेश असूनही काळू नदीच्या उगमस्थानी असलेल्या धबधब्यावर बोरिवलीहून 250 पर्यटक पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी आले होते. पण पाण्याचा प्रवाह वाढला आणि सर्वजण अडकले. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करीत सर्वांची सुखरूप सुटका केली. दरम्यान धबधब्यावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुरबाडमधील माळशेज घाट व नाणेघाट येथे दरवर्षी अनेक पर्यटक पावसाळ्यात जातात. मात्र तेथे धांगडधिंगा होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी धुडकावून बोरिवलीहून बुधवारी काळू नदीजवळ असलेल्या धबधब्यावर आले. नदीचे उगमस्थानच येथून असल्याने पाण्याचा मोठा प्रवाह होता. त्याचा अंदाज न आल्याने कोणालाच बाहेर पडता येईना. ही माहिती मिळताच मुरबाड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने या सर्वांची सुटका केली. या पर्यटकांची पोलिसांनी चांगलीच हजेरीही घेतली.