
राहाता तालुक्यात अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या कारणातून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सचिन कल्याणराव गिधे (रा. शिर्डी, ता. राहाता) हा 10 डिसेंबर 2025 रोजी शिर्डी येथे गेला होता. त्यानंतर तो घरी परत न आल्याने त्याची पत्नी श्रद्धा गिधे यांनी 15 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार प्रवीण उर्फ पचास वाघमारे आणि दीपक पोकळे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अपहृत सचिन गिधेचा शोध न लागल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने सलग 15 दिवस पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आदी ठिकाणी तपास करत अखेर 6 जानेवारी रोजी मेंढवण (ता. संगमनेर) येथील दगडाच्या खाणीत दीपक पोकळे आणि गणेश दरेकर यांना अटक केली.
सखोल चौकशीत दीपक पोकळे याने प्रवीण वाघमारे, गणेश दरेकर आणि कृष्णा वाघमारे यांच्या मदतीने सचिन गिधेचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून त्याची विल्हेवाट लावल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीची विनानंबर स्कॉर्पिओ गाडी, तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण 15.72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुख्य आरोपी दीपक पोकळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न, मोक्का, आर्म ॲक्टसह एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिर्डी, राहाता, संगमनेर व परिसरात त्याची दहशत होती.



























































