
मुरुड ते श्रीवर्धन प्रवास करण्यासाठी शॉर्टकट म्हणून रो-रो किंवा फेरी बोटीने जावे लागते. मात्र भरती-ओहोटीमुळे अनेकदा सागरी प्रवास बंद असतो. त्यामुळे नाइलाजास्तव पर्यटकांसह नागरिकांना रस्ते मागनि 110 किलोमीटरचा फेरा मारून प्रवास करावा लागतो. मात्र आता ही फरफट लवकरच थांबणार आहे. मुरुड-श्रीवर्धन तालुक्याला जोडणाऱ्या सवाचार किमी खाडीपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुरुड-श्रीवर्धन जवळ येणार आहे. पुलामुळे पर्यटकांसह स्थानिकांचा तब्बल 70 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 4.3 किमी आगरदांडा खाली पूल उभारत आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग एसएच-4 (रेवस रेड्डी किनारी महामार्ग) वरील या दोन पदरी पुलाच्या बांधकामाला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जानेवारी 2024 ला मंजुरी दिली होती. हा पूल अदानी पोर्ट्स अॅण्ड एसईझेडच्या दिघी बंदर प्रकल्पाच्या पूर्वेला बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलामुळे श्रीवर्धन व मुरुड तालुका जोडला जाणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या पुलाचे काम सुरू असून आतापर्यंत समुद्रात चार पोल उभारण्यात आले आहेत.
पर्यटनवाढीसाठी पर्वणी
पुलाच्या कामासाठी 809.89 कोटी कंत्राट असून 30 महिन्यांच्या कालावधीत हे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामध्ये अतिरिक्त 10 वर्षे देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे. हा पूल तयार करण्यासाठी अंदाजे दोन हजार कामगारांची आवश्यकता आहे. मात्र सध्या एक हजार कामगार काम करत आहेत. मुरुडसह दिघी, दिवेआगार, श्रीवर्धन, म्हसळा, हरिहरेश्वर या ठिकाणी वर्षाला दोन लाखांहून अधिक पर्यटक येतात. त्यामुळे हा पूल येथील पर्यटनवाढीसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
























































