रत्नागिरीच्या चित्पावन मंडळाच्या ‘संगीत मानापमान’चा नागपुरात सत्कार

संगीत राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकप्राप्त रत्नागिरीच्या अखिल चित्पावन मंडळाच्या राजेंद्र पटवर्धन, श्रीनिवास जोशी, प्रवीण शिलकर, अमेय धोपटकर, श्री. बापट यांना पारितोषिक देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व किर्ती शिलेदार.

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित बालनाट्य, संस्कृत, हिंदी, हौशी मराठी गद्य नाट्य व व्यावसायिक, हौशी संगीत नाट्यस्पर्धांचे बक्षीस वितरण नागपूर येथे शनिवारी रात्री झाले. प्रथमच यजमानपद संत्रानगरी नागपूरला लाभले. नागपूरच्या वसंतराव देशपांडे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये द्वितीय पुरस्कारप्राप्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या ‘संगीत मानापमान’च्या चमूला ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नाट्यसंमेलन अध्यक्षा किर्तीताई शिलेदार यांनी गौरवले.

57 व्या संगीत नाट्य स्पर्धेत चित्पावन ब्राह्मण मंडळाने पदार्पणात घवघवीत यश संपादन केले. त्यांनी सादर केलेल्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाला 5 वैयक्तिक पारितोषिकांसहित सांघिक द्वितीय क्रमांक मिळाला. तबला प्रथम निखिल रानडे, ऑर्गन साथ प्रथम विलास हर्षे, संगीत मार्गदर्शन द्वितीय श्रीनिवास जोशी, गायन रौप्यपदक प्रवीण शीलकर (भूमिका धैर्यधर) व सिद्धी बोंद्रे (भूमिका भामिनी) यांना किर्ती शिलेदार व पालकमंत्री बावनकुळे यांनी पारितोषिक दिले. या वेळी अभिनेते अभिजित खांडकेकर, भारत गणेशपुरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते.

रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्थेनेही सादर केलेल्या संगीत लावण्यसखीला वैयक्तिक बक्षिसे मिळाली. उत्कृष्ट नेपथ्यासाठी दादा लोगडे यांना प्रथम, नाट्यलेखनाचे द्वितीय पारितोषिक अमेय धोपटकर, उत्कृष्ट अभिनयाचे प्रमाणपत्र दिग्दर्शक नितीन जोशी व उत्कृष्ट गायनासाठीचे प्रमाणपत्र संचिता जोशी हिला प्रदान केले.

या वेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे दिल्लीला गेल्यामुळे त्यांनी दिलेल्या संदेशाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले. नागपूर झाडीपट्ट्यातील कलाकारांनी विनोदी स्कीट सादर केली. युवा कलाकारांनी नृत्य प्रकारांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारींच्या कविता स्क्रीननवर दाखवून व ‘मोरूची मावशी’फेम विजय चव्हाण यांना मावशीच्या गाण्याचा प्रवेश सादर करून श्रद्धांजली वाहिली. तसेच स्पर्धेत प्रयोग चालू असताना रंगभूमीवर देवाज्ञा झालेल्या राणे यांना मरणोत्तर पुरस्कार दिला. त्यांच्या मुलीने पुरस्कार स्वीकारला त्यावेळी राणे यांना सार्‍यांनी उभे राहून आदरांजली वाहिली.