लढाऊ विमानाने शाळेवर बॉम्ब टाकला, 20 विद्यार्थी ठार, 50 जखमी; म्यानमारमधील लष्करी राजवटीचे क्रौर्य…

म्यानमारमधील लष्करी राजवटीने शनिवारी क्रौर्याची परिसीमा गाठली. लष्कराच्या लढाऊ विमानांनी क्योक्ता भागातील एका शाळेवर दोन बॉम्ब टाकले. यात 20 विद्यार्थी ठार झाले असून 50 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्राने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे, मात्र म्यानमारच्या लष्करी राजवटीने या हल्ल्याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही.

म्यानमारमधील स्थानिक वृत्तवाहिनी ‘म्यानमार नाऊ’ ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून क्योक्ता प्रांतात लष्कर आणि स्थानिक आरकान आर्मीमध्ये संघर्ष सुरू आहे. आज लष्करी राजवटीने लढाऊ विमानातून मध्यरात्री खासगी शाळेवर दोन बॉम्ब टाकले. हा बॉम्बहल्ला झाला तेव्हा विद्यार्थी गाढ झोपलेले होते. या बॉम्बहल्ल्यात 20 विद्यार्थी ठार झाले असून 50 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. शाळेवरील बॉम्बफेक प्रकरणात अजूनही म्यानमारच्या लष्करी राजवटीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. संयुक्त राष्ट्र संघाने या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे.

2021 मध्ये म्यानमारमध्ये लष्कराने आंग सांग स्युकी यांचे सरकार उलथून सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून म्यानमार अस्थिर आहे. लष्कराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. मात्र लष्करी राजवटीने दडपशाही चालवल्याने असंतोष पसरला आहे.