नगरचा भुईकोट किल्ला सामान्य जनतेसाठी खुला होणार! लवकरच निर्णय घेणार असल्याची पालकमंत्र्यांची घोषणा

नगर जिह्यामध्ये पर्यटन वाढावे, याकरिता अनेक वेळेला चर्चा झाल्या, अनेकांनी आश्वासने दिली. मात्र, त्यासाठी ठोस उपाययोजना होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, पर्यटनवाढीच्या दृष्टीने लष्कराच्या ताब्यात असलेला नगर शहरातील भुईकोट किल्ला जनतेसाठी खुला करण्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे.

नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानांसह राज्यातील सर्वांत उंच असलेले कळसुबाई शिखर, रतनगड, हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा धरण नगर शहरातील अवतार मेहेरबाबा देवस्थान व पाथर्डीतील मोहटा देवी, पारनेर तालुक्यातील कोरठाण खंडोबा, निघोजचे रांजणखळगे, तर आनंदऋषी महाराजांचे जन्मस्थळ असलेले चिचोंडी शिराळ गाव याच जिह्यात आहे. तरीही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नगर जिल्हा मागे असल्याचे दिसून येत आहे. शहरालगतच्या पिंपळगाव माळवी तलावाची 700 एकर जागा महापालिकेला मिळालेली आहे. मात्र, या जागेचे काय करायचे, याबाबत अद्यापि कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या ठिकाणी मोठे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे गरजेचे आहे.

नगर शहरात भुईकोट किल्ला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू या किल्ल्यावर कैदेत असताना त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यकाळामध्ये अनेक स्वातंत्र्यसेनानी या किल्ल्यात कैदेमध्ये होते. त्याच्या आठवणी आजही या ठिकाणी कायम आहेत. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दोनदिवशी सामान्य जनतेसाठी हा किल्ला खुला केला जातो. 2010 साली हा किल्ला जनतेसाठी खुला करावा म्हणून प्रयत्न झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा विषय पुढे आला. त्यासाठी कोटय़वधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी स्वतंत्र असा निधी उभारून या ठिकाणी संरक्षण भिंतीचा विषय मार्गी लावला. हा किल्ला सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार, ही चर्चा तेव्हापासूनच सुरू होती. मात्र, हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असून, येथे लष्कराचे कार्यालयही आहे. दरम्यान, हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असल्यामुळेच सुस्थितीत आहे.

या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी आजवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता नगर जिह्याचे पर्यटन वाढावे, यासाठी हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्यातच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भुईकोट किल्ल्याचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. केंद्रीय मंत्र्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोलणी झालेली आहे. लवकरच या संदर्भातील करार असा करण्यात येईल. त्यानंतर हा किल्ला जनतेसाठी खुला करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता दहा वर्षांपासून रखडलेला विषय आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.