नगर जिल्हा पोलीस दलामध्ये भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली जाणार असून, बुधवारपासून (दि. 19) या स्पर्धा सुरू होणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आदी उपस्थित होते.
राकेश ओला म्हणाले, नगर जिह्यात पोलीस दलामध्ये नव्याने भरती प्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये 25 पोलीस व 39 चालकांची भरती होणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. बुधवारपासून (दि. 19) ही भरतीप्रक्रिया नगर येथे सुरू होणार आहे. याच्या स्पर्धा सुरू होणार असून, प्रथम 1600मीटर अंतर पार करायचे आहे. त्यानंतर 100 मीटर अंतर व नंतर गोळाफेक असे नियोजन करण्यात आले आहे. जे विद्यार्थी सहभागी असतील त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच शारीरिक चाचणी होणार आहे.
19 ते 17 जूनपर्यंत सर्वजण परीक्षा देणार आहेत. दररोज 500 विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. यासाठी आठ दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, असे अधीक्षक ओला यांनी सांगितले. नगर शहरातील बायपास महामार्ग रनिंगसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. गोळा फेकसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मैदान निश्चित केले आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, याकरिता पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही अधीक्षक ओला यांनी सांगितले.
नगरसाठी 500 जागांची मागणी
नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा जिल्हा आहे. या जिह्यामध्ये पुरुषांची कर्मचाऱयांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही 500 पदांची नव्याने मागणी केली आहे. पण या भरतीशी त्याचा काहीही संबंध नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.
दुसऱया ठिकाणी अर्ज करण्यास मिळणार मुदत
ज्या विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी अर्ज केले असतील तर त्यांना ज्या ठिकाणी प्रथम बोलावण्यात येईल, त्यांनी तेथे हजर राहावे. दुसऱया ठिकाणी जाण्यासाठी त्यांना चार दिवसांची मुभा देण्यात आली आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्वतंत्र अर्ज करावा, असे नमूद करण्यात आले असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले आहे.