Nagar News – विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? गावकऱ्यांमध्ये चर्चा

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे धक्कादायक प्रकार घडला असून मुसमाडे वस्तीमधील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुणाची ओळख पटली नसून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे.

देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुथ्था यांच्या शेतात स्वमालकीची विहीर आहे. आज (04 जुलै) दुपारी 12 च्या दरम्यान यशावंत पोटघन यांना सुभाष मुथ्था यांच्या विहिरीत पिवळा टी शर्ट व काळ्या रंगांची पॅन्ट घातलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विष्णु आहेर यांनी धाव घेऊन पंचनामा केला. या ठिकाणी विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कर्मचारी भारत साळुंके, सोमनाथ सूर्यवंशी, सुनील खाटीक, सखाहरी सरोदे, रमेश म्हसे, प्रसन्न पंडित, महेश पवार, दिलीप बर्डे तसेच राजेंद्र कदम, बाबजी काळे, नवनाथ काळे, शरद काळे, संदीप मोरे, बाळू मोरे, दत्तू मोरे, राजेंद्र पंडित, दीपक पाडळे, संभाजी कडू, दिनकर कडू, रंगनाथ मुसमाडे, संजय पंडित तसेच छत्रपती प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व मुसमाडे वस्ती येथील नागरिकांनी परिश्रम घेतले. सदर मृतदेह रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.