नगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरील पाण्यामध्ये वीजप्रवाह प्रवाहीत झाल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या बैलांना विजेचा जबर धक्का बसला आणि दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने बैलगाडीवर असाणारे पती-पत्नी बचावले आहेत.
सदर घटना जामखेड तालुक्यातील वाघा गावामध्ये गुरुवारी (20 जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात गेले होते. दिवसभर शेतातली कामे आटपून संध्याकाळी बैलगाडीतून ते घरी परतत होते. यावेळी पावसाला सुद्धा सुरुवात झाली होती. दरम्यान वाघा गावात एका लाईटीच्या पोलचा वीजप्रवाह रस्त्यावर साठलेल्या पाण्याच प्रवाहीत झाला होता. जेव्हा बैलगाडी या पाण्याच्या संपर्कात आली तेव्हा दोन्ही बैलांना विजेचा जबर धक्का बसला आणि बैलांचा मृत्यू झाला. बबन बारस्कर आणि त्यांची पत्नी हे बैलगाडीवरील गवताच्या वरती बसले होते. त्यांनी तत्काळ गाडीतून बाहेर उड्या मारल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
या गंभीर अपघातात शेतकरी बबन बारस्कर यांच्या दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेचा तातडीने पंचनामा करुन संबंधित विभागाकडून शेतकऱ्यास आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.