Nagar News – किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी

अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश केल्याने काळे यांना अटक केली. अटकेनंतर काळे यांना शुक्रवारी येथील सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला.

किरण काळे यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील 776 रस्त्यांच्या सुमारे 400 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कागदपत्रे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे दिली होती. यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत या प्रकरणावर तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केली होती. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा घोटाळा उघडकीस आणल्याने किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी 22 जुलै रोजी पहाटे 3 वाजता काळे यांना अटक केली. यानंतर त्यांना येथील न्यायालयामध्ये हजर केले होते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी पुन्हा काळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली. पुढील सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे.