नगर जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पारनेर तालुक्यात पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
पारनेर तालुक्यातील सुपे महसूल मंडळातील काही गावे वगळता इतरत्र पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या तीन-चार वर्षात प्रथमच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध बियाणे, खतांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पेरणीच्या खर्चाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. मागील वर्षी वाटाण्याच्या बियाण्याची 40 किलोची गोणी साडेतीन ते चार हजार रुपयांना मिळत होती. मात्र यावर्षी त्याची किंमत साडेसात हजार रुपये झाली आहे. यंदा हिरव्या वाटाण्याला मिळणाऱ्या दरापेक्षा बियाण्याचा दर जवळपास चौपट आहे. तसेच साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल किंमतीने विकले जाणारे सोयाबीन बियाण्याचे दर प्रतिक्विंटल साडेसात ते आठ हजार रुपये इतके आहे. बियाण्यावर केली जाणारी प्रक्रिया, मजुरी व कंपनी, व्यापाऱ्यांचा नफा या सर्व बाबी विचारात घेतल्या तर बियाण्याचा दर जास्त असल्याचे वाटाणा उत्पादकांचे म्हणने आहे.
बाजरी, मूग, मका, उडीद या खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या बियाण्यांच्या किंमतीती गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे 20 टक्के वाढ झाल्याचे बियाणे व खत विक्रेते अशोक डमरे यांनी सांगितले. “वाटाण्याचे बियाणे मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातून आणले जातात. तेथे वाटाण्याच्या हंगामात गारपीट झाल्याने वाटाण्याचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तेथील स्थानिक बाजारपेठेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगाना उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे बियाण्यासाठी पीक राखून ठेवण्याऐवजी हिरव्या शेंगा विकणे शेतकऱ्यांनी पसंत केले. परिणामी बियाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे वाटाण्याच्या बियाण्यांच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे, ” अशी माहिती अशोक डमरे यांनी दिली.
सोयाबीन बियाण्यासाठी अनुदान
कृषी विभागाकडून सोयाबीन बियाण्यासाठी प्रतिकिलो 25 रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणे 85 रुपयांऐवजी 65 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करता येईल. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून परवाना (परमीट) घेऊन महाबिजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून अनुदानित सोयाबीन बियाणे खरेदी करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारूती घुले यांनी केले आहे.
चालू खरीप हंगामातील पीकनिहाय प्रस्तावित क्षेत्र
1) बाजरी – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 17 हजार 709, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – १८हजार ५९४
2) मूग – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 16 हजार 099, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 18 हजार 022
3) सोयाबिन – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 12 हजार 507, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 13 हजार 132
4) वाटाणा – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 6 हजार 516, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 6 हजार 842
5) मका – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 2 हजार 184, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 2 हजार 293
6) तूर – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 2 हजार 170, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 2 हजार 278
7) कांदा – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 930, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 1 हजार 531
8) ऊस – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 516, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 542
8) उडीद – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 258, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 270
9) भुईमुग – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 33, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 35
एकूण – गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) – 58 हजार 082, चालू हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टर) – 63 हजार 539