नगरमध्ये मातीचा ढिगारा कोसळून राहुरीत कामगार ठार; दोन जखमी

जियो कंपनीच्या केबलचे काम करणारे तीन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने एकाचा गुदमरून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाला राहुरीत, तर दुसऱ्याला नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मातीचा ढिगारा कोसळत असताना इतर केबल कंपनीचे दोन मजूर खड्ड्यातून बाहेर पळाल्याने बचावले आहेत.

प्रदीप चंद्रभान भोसले (वय 27, रा. गळलिंब) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. आकाश सुरेश देवढे आणि दत्तात्रय जालिंदर चितळकर (रा. चिंचाळे, ता. राहुरी) अशी जखमी मजुरांची नावे आहेत.

रविवारी मध्यरात्री नगर- मनमाड महामार्गावरील राहुरी हद्दीत ही घटना घडली. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शनिवारी दुपारी कंपनी व्यवस्थापनाकडून घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्याने 10 फुटांपेक्षा जास्त खोल खड्डा खणण्यात आला होता. यावेळी तुटलेल्या केबल जोडणीसाठी जियो व इतर केबल कंपनीचे मजूर रविवारी रात्री काम करत होते. खोदलेला खड्डा मनमाड महामार्गालगत असल्याने अवजड वाहनाच्या हादऱ्याने मातीचा ढिगारा कोसळला आणि तीन मजूर दबले गेले. यावेळी आरडाओरड झाल्याने रस्त्यावरील वाहनधारकांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यास मदत केली.

या घटनेत प्रदीप चंद्रभान भोसले या मजुराचा मृत्यू झाला असून, आकाश देवढे आणि दत्तात्रय चितळकर हे जखमी झाले. काल दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर प्रदीप भोसले यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मातीच्या ढिगाऱ्याखाली मजूर गाडल्याची गंभीर घटना घडूनही गॅस कंपनीचे व्यवस्थापन तसेच केबल कंपनीचे ठेकेदार सोमवारी सकाळपर्यंत घटनास्थळी फिरकले नव्हते. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. तर, राहुरी पोलीस माहिती मिळताच, सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते.

नगर-मनमाड महामार्गावर गेल्या दोन वर्षांपासून नगर व कोल्हार या दोन्ही मार्गांकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना यापूर्वीदेखील अघटित घटना घडल्या आहेत. आता रविवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.