नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळय़ाची सुनावणी 2 डिसेंबरपासून

432

नागपूर जिह्यात 17 वर्षांपूर्वी गाजलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील साक्षीदारांची यादी न्यायालयामध्ये काल सादर करण्यात आली. या प्रकरणावर 2 डिसेंबरपासून सत्र न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमक्ष नियमित सुनावणी सुरू होणार आहे. न्यायालयाने या साक्षीदारांना समन्स बजावण्याचे आणि दिलेल्या तारखेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

मागील सुनावणीमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकार्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली निघावे, यासाठी उच्च न्यायालयाने विशेष न्यायपीठ स्थापन करीत, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस.आर. तोतला यांची नियुक्ती केली आहे. एनडीसीसी बँकेने 2001-02 साली होम टेड लिमिटेड मुंबई, इंद्रायणी मर्चंट्स प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. मात्र, कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व रक्कमही परत केली नाही. विशेष लेखा परीक्षक विश्वनाथ असवार यांनी बँकेचे लेखा परीक्षण करून 29 एप्रिल 2002 रोजी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

आपली प्रतिक्रिया द्या