
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नागपुरातही हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. बुटीबोरी भागात सासरच्यांकडून हुंडय़ासाठी होणाऱया छळाला कंटाळून 26 वर्षीय मयुरी डाहुले हिने लग्नाच्या 35 दिवसांतच गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयुरीचं अभिषेक डाहुले याच्यासोबत 25 एप्रिल रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच अभिषेकच्या आई-वडिलांनी लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केली. पण नुकतेच लग्न झाले आहे, सगळं काही ठीक होईल, असे वाटून तिने आई-वडिलांना याबाबत काहीच सांगितले नाही. दरम्यान, मयुरी माहेरी गेल्यानंतरच सासरच्यांकडून होणाऱया छळाबाबत त्यांना कळले. त्यानंतर मयुरीच्या वडिलांनी गटाच्या भीशीचे 20 हजार रुपये दिले. आई-वडील आणि भाऊ रोजंदारी करून आपले घर चालवत असल्याने अधिक पैसे ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे मयुरी सासरी परतल्यावर तिचा छळ आणखीनच वाढला.
भावाने येऊन समजावले पण सासरच्यांनी उलट त्यालाच दम भरला. पैसे दिले नाही तर तुलाही मारू असे धमकावले. त्यानंतर मयुरी खचून गेली. रोजच्या छळाला कंटाळून अखेर तिने जीवन संपवले. याबाबत गुन्हा नोंदवून पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले व दीर आदित्य डाहुले यांना अटक केली आहे.





























































