वसईत 10 टनाची काचेची थप्पी अंगावर कोसळून दोन कामगार ठार, नायगाव येथील ससूपाड्यातील घटना

एका काच कारखान्यातील 10 टन वजनाची काचेची थप्पी अंगावर कोसळून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. कशिश यादव (17) आणि अक्रम अख्तर अली खान (27) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना नायगाव पूर्वेच्या ससूपाड्यातील काच कारखान्यात घडली. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी कारखाना मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथील संभाजी इंडस्ट्रीमध्ये प्राडाजी प्रा.लिमिटेड हा काच कारखाना आहे. अक्रम आणि कशिश हे दोघेही त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात. मालकांनी त्यांना काचेची थप्पी वाहून नेण्याचे काम सांगितले होते. हे काम करत असतानाच अचानक काचेची थप्पी त्यांच्या अंगावर कोसळली. दोघेही त्या काचेखाली दबले गेले. तातडीने त्यांना नायगाव येथील नीळकंठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दोघांचाही रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कारखाना मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याने मेहुल जैन (26), रोहित जैन (26) या कारखाना मालकांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.