शेतकरी दुष्काळाने त्रस्त सत्ताधारी मात्र राजकीय साठमारीत व्यस्त, काँग्रेसचा मिंधे सरकावर हल्ला

जनतेला दुष्काळाचे चटके बसत असताना राज्यातला सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यस्त आहे. सध्याची शेतकऱयांची अवस्था लक्षात घेता कोरडवाहू शेतीला एकरी 25 हजार रुपये, बागायती शेतीला एकरी 50 हजार रुपये तसेच फळबागांना एकरी एक लाख रुपये मदत तातडीने द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत काँग्रेसने राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. राज्यातील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे, असे नाना पटोले म्हणाले

सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नाही.

शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. संपूर्ण राज्यातील जनता अत्यंत अडचणींचा सामना करत आहे. दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत, पण राज्य सरकार मात्र अजगरासारखे सुस्त पडून आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असतानाही सत्ताधारी पक्ष त्याकडे गांभीर्याने पाहत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारने केवळ आढावा बैठक घेण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक पालकमंत्री गैरहजर होते. त्यामुळे सरकारला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही हे स्पष्ट झाले आहे, याकडे नाना पटोले यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले.

शेतकऱयांची अवस्था पाहता जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे.

नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष