नानावटीत देशातील पहिली रोबोटिक स्ट्रासमन मेट्रोप्लास्टी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात देशातील पहिली रोबोटिक स्ट्रासमन मेट्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एका 23 वर्षीय तरुणीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गर्भधारणेच्या दुसऱया तिमाहीत तिचा तीन वेळा गर्भपात झाला होता. शस्त्रक्रियेनंतर आता तिची सुरक्षितपणे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढली असल्याचे ही शस्त्रक्रिया करणारे रुग्णालयाच्या ‘ऍडव्हान्स्ड रोबोटिक गायनेकॉलॉजी ऍण्ड सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड एंडोमेट्रिओसिस’ विभागाचे संचालक डॉ. उद्धवराज दिढवाडिया यांनी सांगितले.

सदरहू तरुणीला ‘बायकोर्न्युएट युटरस’ हा गर्भाशयाचा आजार जन्मजात होता. यात गर्भाशयाची एक सलग पोकळी तयार होण्याऐवजी त्याचे दोन स्वतंत्र भाग तयार होतात. शस्त्रक्रियेने ते दोन स्वतंत्र भाग एकत्र जोडून एक सलग पोकळी तयार केली गेली, जेणेकरून गर्भधारणेसाठी योग्य जागा निर्माण होईल. पूर्वी अशा दुर्मिळ जन्मजात विकारांसाठी मोठी शस्त्रक्रिया आणि वेदनादायक उपचारांशिवाय पर्याय नसायचा. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आता पोटाला छोटी छिद्रे पाडून ही शस्त्रक्रिया करता येते, असे दिढवाडिया यांनी सांगितले.