
नांदेड शहरात गँगवारने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची धारधार शस्त्राने वार करून, तर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोघांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात शुक्रवारी रात्री सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजितसिंग चव्हाणवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अरिजितसिंग गजानन चव्हाण (वय – 25) जागीच मरण पावला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात नेले.
त्यानंतर अरिजितसिंगचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय -27) आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय – 23) वर दवाखान्यातील अपघात विभागाजवळ चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ते दोघेही जागीच गतप्राण झाले.
दरम्यान, ही घटना गँगवारमधील जुना वाद किंवा वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिघांवर एकाच वेळी समन्वय साधून हल्ला करण्यात आला असल्याने हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्लेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे. फॉरेन्सिक पथकाकडूनही घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नांदेड शहरात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे आणि ‘सिंघम’ अशी उपाधी मिळालेले अधिकारी कार्यरत असतानाही अशा प्रकारची तिहेरी हत्या घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.



























































