
उज्जैन येथून देवदर्शन आटोपून माहूरकडे परत येत असताना बुलढाणा बायपासच्या खातखेड फाट्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिलेल्या धडकेत कारमधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत नांदुरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश आंदुसिंग राठोड (42) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे नातेवाईक उज्जैन येथून देवदर्शन करून गावाकडे परतत होते. त्यावेळी खातखेड फाट्याजवळ एका ट्रक चालकाने टायरचा रिमोट पट्टा निघाल्याने कोणतीही सुरक्षितता न बाळगता तसेच इंडिकेटर न देताच सदरचे वाहन निष्काळजीपणे रस्त्याच्या मध्यभागी थांबवले. त्यामुळे मागून येणाऱ्या एर्टिंगा कारच्या चालकाला कसलाच अंदाज आला नाही व ती कार ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की गाडी समोरुन पूर्णपणे चक्काचूर झाली. या अपघातात गाडीतील देवराव गंगाराम पवार (60), बबीता देवराव पवार (55), निकेतन देवराव पवार (26) रा. लोकरवाडी ता. माहूर जि. नांदेड हे तिघे जागीच ठार झाले. तर मोनिका जीवन राठोड (32) रा. किनवट, भूमिका रामराव राठोड (18), प्रियंका देवराव पवार (30) रा. किनवट, हिताशी जीवन राठोड (2 वर्षे) रा. किनवट तर इर्टीगा चालक संतोष भगवान कदम (39) रा. करंजी, ता. माहूर हे पाच जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, पोहेकॉ. काशीनाथ जाधव, वाहतूक शाखेचे वाघमारे यांच्यासह 108 रुग्णविहिकेचे डॉ. शेख, चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अपघातातील जखमींना मदत केली. जखमींना पुढील उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविले. याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. उमेश भारसाखळे हे करीत आहेत.