
नांदेड जिल्ह्यातील पाळज येथील सुप्रसिद्ध श्री गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या आठ दिवसापासून मोठी गर्दी होते आहे. मात्र वर्षातून एकदाच दर्शनासाठी खुला असणाऱ्या या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या गणपती मंदिराच्या दिशेने जाणारा दिवशी गाव ते पाळज या मधील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा रस्ता खड्ड्यांनी भरला असून त्यातून कंबरतोंड करत भाविकांना जावे लागत आहे.
नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल pic.twitter.com/GmupEQctyR
— Saamana Online (@SaamanaOnline) September 4, 2025
पाळज येथील सुप्रसिद्ध श्री गणपतीचे वैशिष्ट म्हणजे हा लाकडी गणपती केवळ गणेशोत्सवात दर्शनासाठी खुला असतो. याचे विसर्जन होत नाही. विसर्जनाच्या दिवशी या श्री गणेशाची विधिवत पूजा करून तो कुलुप बंद केला जातो. त्यांनंतर पुढील वर्षी श्री स्थापनेपासून केवळ 10 दिवसांसाठी पुन्हा उघडला जातो. नांदेड, हिंगोली, परभणी आणि नजीकच्या तेलंगणा राज्यातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. प्रचंड मोठ्या रांगा लागतात. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी किमान सहा तास लागत असून संस्थानच्या सदस्यांनी भाविकांची चांगली व्यवस्था केली आहे . मात्र या मार्गावरील दिवशी ते पाळज या रस्त्याची दुर्दशा झाली आहे खड्ड्यांनी भरलेला रस्ता पार करत भाविकांना जावे लागत आहे. दोन वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू आहे असे दिवशी गावचे ग्रामस्थ सांगतात. अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांच्या अधिकारी मंडळींकडे याबाबत तक्रारी केल्या गेल्या मात्र हा रस्ता दुरुस्त झाला नाही. या रस्त्यावरून श्री च्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनांची खड्डे चुकवताना कसरत होत आहे.
दोन वर्षे झाली या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होत नाहीए. लोकप्रतिनिधींकडे देखील तक्रारी केल्या मात्र रस्ता पूर्ण होऊ शकला नाही असे गावकरी मंडळींचे म्हणणे आहे. किमान या ऐतिहासिक श्री गणेशोत्सवात तरी हा रस्ता दुरुस्त व्हायला हवा होता, तो होऊ न शकल्याने श्री भक्त संबधित विभागाला शिव्या घालत संताप व्यक्त करत आहेत.