
सेवानिवृत्तीनंतरचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने, नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेतले होते. सुनील राधाकृष्ण कुलकर्णी (60) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, मृत्यूशी झुंज देत असताना शनिवारी (14 मार्च) रात्री एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
सुनील कुलकर्णी हे एमजीएम महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवेत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची काही रक्कम संस्थेकडे थकीत होती. त्याच्यासोबत अन्य काही कर्मचाऱ्यांच्या रक्कमा देखील विविध तांत्रिक कारणाने प्रलंबित असल्याची माहितीसमोर आली आहे. आपली रक्कम त्वरित मिळावी यासाठी सुनील कुलकर्णी यांनी संस्थेकडे तगादाही लावला होता. मात्र ती रक्कम न मिळाल्याने 13 मार्च रोजी दुपारी त्यांनी एमजीएम कॉलेज परिसरात अंगावर पेट्रोल टाकुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून ही आग विझवली. त्याला तत्काळ एका खासगी दवाखान्यात उपचाराराठी दाखल करण्यात आले होते.. उपचारादरम्यान त्यांचा 14 मार्च रोजी रात्री खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला.
अनेक वर्षे एमजीएम काँलेजमध्ये प्रामाणिकपणे सेवक म्हणून कार्य केलेले सुनील कुलकर्णी यांना अन्याय आणि मानसिक त्रासामुळे अखेर मृत्यूशी झुंज देताना आपले प्राण गमावले ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. एका साध्या, कष्टकरी कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या पैशांसाठी इतका संघर्ष करावा लागणे आणि शेवटी असे टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे..


























































