Nanded News – तीन दिवसानंतर पावसाने घेतली उसंत, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

>>विजय जोशी

पिके बहरली, सोयाबीनला शेंगा लागू लागल्या, मुगही बहरला, ज्वारीची पिकेही डौलू लागली आणि 72 तासात होत्याचे नव्हते झाले. ऐन पिके बहरत असताना आमच्या हातातोंडाचा घास गेला, अशा भावना नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आहेत.

तीन दिवसाच्या प्रचंड पावसानंतर नांदेड जिल्ह्याचा पाऊस आज ओसरला. मात्र कधी अवकाळी, कधी आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचे बेहाल झाले आहेत. यावेळी मृगनक्षेत्राच्या आठ दिवसानंतर पाऊस सुरु झाला, पेरण्याही जुलै महिन्यात झाल्या. पावसाने मध्यंतरी ओढ दिली. जुलै महिन्याच्या मध्यात चांगला पाऊस झाला. पिके डौलू लागली. यावेळी चांगले पिके येतील, भरपूर उत्पन्न मिळेल, पैसाही चांगला मिळेल. या आनंदात असताना मात्र 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास हिरावून गेला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट, माहूर, अर्धापूर, मुदखेड, नायगाव, लोहा व नांदेड तालुक्यात पिकांचे झालेले नुकसान हे अतोनात आहे. विशेष म्हणजे सोयाबीन, काढणीला आलेला मूग, कपाशी, उडीद व ज्वारीला तसेच मका पिकाला याचा जबरदस्त फटका बसला आहे. पाऊस ओसरल्यानंतर सुध्दा आज जिल्ह्यात बहुतांश भागात गुडघाभर पाणी साचले आहे. हातचे पीक वाया गेल्याने ऐन बैल पोळ्याच्या दिवशी बळीराजा मात्र सर्वत्र चिंतेत होता. अनेक ठिकाणी शेतात जावून तो हताशपणे रडत होता.

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस हा नांदेड जिल्ह्याला नविन नाही. गेल्या वर्षभरात तीनवेळा अवेळी आलेल्या पावसाने कधी रब्बीला, कधी खरिपाला मोठा धोका निर्माण होवून बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अर्धापूर भाग हा केळी पिकविणारा. या भागातील केळी आता आडवी पडली आहे. सरकारने अद्यापही हिमायतनगर व हदगाव तालुक्यात मागच्या पीकविम्याचे पैसे दिले नाहीत. 50 टक्के शेतकर्‍यांना अद्यापही नुकसानीच्या पंचनाम्याचे पैसे मिळाले नाहीत. कसेबसे करुन शेतकर्‍यांनी यावर्षी पेरणी केली. पाऊसही वेळेवर झाला. मात्र सलग तीन दिवस झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.

शेतीनिष्ठ शेतकरी शिवाजीराव कस्तुरे यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षीपासून बळीराजाला या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अस्मानी व सुलतानी संकाटात सापडलेल्या बळीराजाने यावर्षी पदरमोड करुन पेरणी केली. मात्र आता हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, मका, केळी या पिकांचे झालेले नुकसान अतोनात असून, यावर्षी देखील शेतकर्‍यांना हाल सोसावेच लागणार आहेत. बळीराजाची ही परिस्थिती अत्यंत केविलवाणी आहे. सरकारच्या तुटपुंज्या मदतीचा हात आमच्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाना सावरेल का, मिळालेली मदत हि आयुष्यभर पुरणार आहे का, ही परिस्थिती आमच्या भागातील शेतकर्‍यांची आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान असून, 29 जनावरे यात मृत्यूमुखी पडले आहेत. सततचा भिज पाऊस व काही भागात झालेली अतिवृष्टी ही भयावह असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. त्याची मोजणी प्रशासन करत आहे. पंचनामे होतील, अहवाल येतील, मात्र तुटपुंज्या मदतीवर बळीराजाचे संकट मात्र कायम राहणार हे निश्चित.