
नांदेड विमानतळावरून होणारी विमानसेवा मागच्या महिन्यात खराब धावपट्टीमुळे बंद पडली होती. त्यामुळे नांदेडमधून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, आता पुढील दोन दिवसांत विमानसेवा सुरू होणार असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केंद्र व राज्यातील अधिकाऱ्यांना केलेल्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे खराब झालेल्या धावपट्टीचे काम कमी दिवसात पूर्ण झाले आहे. विमान प्राधिकरणाने त्याची चाचणी केल्यानंतर ही विमानसेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे.
नांदेडच्या विमान तळावरुन बंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, पुणे, पंजाब आदी ठिकाणी विमानसेवा सुरू होती. दोन महिन्यापूर्वी पुण्यावरुन येणारे एक विमान हवेत भरकटले. तसेच हवाई पट्टी खराब झाल्याने एक विमान तब्बल एक तास हवेत धावपट्टीवर उतरू शकले नाही. दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमान तळाची पाहणी व त्याचा अहवाल विमान प्राधिकरणाकडे गेला होता. त्यात नांदेड विमानतळाची हवाई पट्टी खराब असल्याने ती तातडीने दुरुस्त करावी, ती पूर्णतः दुरुस्त होऊन त्यासंदर्भातला अहवाल येईपर्यंत ही विमानसेवा सुरू करू नये, अशी शिफारस विमान प्राधिकरणाने केली होती. त्यामुळे ही विमानसेवा बंद झाली होती. छाती बडवून माझ्यामुळेच विमानसेवा सुरू झाली असा गवगवा करणार्या मंडळींना विमानसेवा बंद पडल्यानंतर काहीच बोलता येईना. ‘आळी मिळी गूपचिळी’ या म्हणीप्रमाणे अनेकांची तोंडे बंद पडली. शासनाचा कुठलाही जीआर आला की, तो माझ्यामुळेच असे उर बडवून सांगणार्या लोकप्रतिनिधींना यावर काहीच बोलता येईना, संवेदनशील असलेल्या जिल्हाधिकार्यांनी याबाबत कुठलाही गाजावाजा न करता केंद्र व राज्यात असलेल्या अधिकाराचा समन्वय तसेच वरिष्ठ अधिकार्यांशी असलेले सबंध वापरुन त्यांनी अखेर हे काम जलदगतीने पूर्ण केले. केंद्रीय विमान हवाई प्राधिकरणाने अखेर या कामाची पाहणी करुन विमानसेवा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेली चार आठवडे बंद असलेली नांदेडची विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, नांदेडची विमानसेवा सुरू करण्याबाबत आपला पाठपुरावा सुरू होता. वरिष्ठांशी आपले बोलणे सुरू होते, यात्रेकरू, अन्य प्रवाशी, व्यापारी, उद्योजक, पर्यटन स्थळांना जाणार्या मंडळींनी आपल्याकडे विनंती करुन सदरची विमानसेवा हि तात्काळ सुरू करण्याबाबत विनंती केली होती. आता विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने नांदेडची विमानसेवा सुरू होण्यास हरकत नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिला.