मुलगी बघायला जाताना तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, सॉफ्टवेअर इंजिनियरसह बहिणीचा जागीच मृत्यू

तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर डागडुजीचे काम चालू असताना महामार्गाच्या कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणा करून पर्यायी रस्ता न ठेवल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात लातूर येथील एकाच कुटुंबातील २ जणांचा मृत्यू झाला तर इतर ८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हादगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ चा हदगाव शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या भानेगाव फाट्याजवळ महामार्गाच्या डागडूजीसाठी फिरणार्‍या वाहनाच्या व महामार्गाच्या कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे जेसीबी व नांदेडवरून आर्र्णीकडे जाणार्‍या आयचर व चाकूरवरून चंद्रपूरकडे जाणार्‍या अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनातील परिवार हा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेल्या मनोज करिता मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूर येथे जात असताना अपघात घडला. त्यात मनोज रामराव देवगुरे (३४) व मंजुषा देवदास आईलवार (३७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, पियुष देविदास आईलवार (४२), मंजुषा निळकंठ असेवाढ (४०), रामराव देगुरे (६०), प्रतिभा देगुरे (५७), दत्तात्रेय अंकुटे (२५), निधी आसेवाड (१४), शरयू असेवाड (७) सर्व रा. लातूर तसेच आयचर वाहन चालक शाहरुख खान (३४) रा.खंडवा मध्यप्रदेश हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती कळताच अंकुश गोदजे, बालाजी ढोरे, राजु तावडे, गजानन देवसरकर, मिलीद पाईकराव, गंगाधर काळे, शंकर जळके, अनिल देशमुख, शुभम गलांडे यांनी तात्काळ मदत करत जखमींना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे आणण्यासाठी धावपळ केली. रुग्णालयात डॉ. प्रदीप स्वामी, डॉ. दादाजी ढगे, डॉ. बालाजी पोटे यांनी नांदेड येथे हलविले.

जर महामार्गाची डागडुजीचे काम चालू असेल तर फलक लावणे गरजेचे असते, परंतु महामार्गाच्या कर्मचार्‍यांना याची गांभीर्य घेतले नाही, अपघात हा महामार्गाच्या ढिसाळ व हलगर्जीपणामुळे घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तात्काळ धाव घेतली व महामार्ग येथे वरील वाहतूक सुरळीत केली.