नांदेड: राज्य सरकारच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात प्रचंड जनआक्रोश! शिवसेनेच्या आंदोलनाने शहर दणाणून सोडले

राज्य सरकारच्या भ्रष्ट व वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांच्या विरोधात आज नांदेड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर जोरदार शिवसेना स्टाईल जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीने हा परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज नांदेडच्या महात्मा फुले पुतळ्याजवळ राज्यातील भ्रष्ट व वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी भ्रष्ट मंत्री मुर्दाबाद, राजीनामा द्या, राजीनामा द्या, वादग्रस्त मंत्र्यांनो राजीनामे द्या, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. सभागृहात रमी खेळणार्‍या कृषीमंत्र्याची हकालपट्टी न करता त्याला समज देवून त्याचे खाते काढून क्रीडा मंत्री केले जाते, संजय शिरसाट, योगेश कदम आदी मंत्र्यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे व त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई न झाल्याने तात्काळ या मंत्र्यांना बडतर्फ करा, अशी मागणी करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे आयटीआयचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी तत्कालीन कृषीमंत्री व आताचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी रमी खेळून वेगळे आकर्षण निर्माण केले.

यावेळी सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, भालचंद्र नाईक, दक्षिण महानगरप्रमुख मनोज यादव, जिल्हा संघटक भाऊसाहेब कदम, शिवसेना उत्तर तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम, दक्षिण तालुकाप्रमुख नंदू वैद्य, शहर प्रमुख आनंद जाधव, शहर प्रमुख अर्जुन ठाकूर, युवासेना जिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार, विधानसभाप्रमुख विजय कल्याणकर, उपजिल्हा संघटक गजानन हरकरे, शहर संघटक पिंटू सुनपे, उपशहरप्रमुख मनोज काकडे, उपतालुकाप्रमुख पुरभाजी जाधव पासदगावकर, शिवसेना तालुका संघटक नवनाथ पाटील जोगदंड, नरहरी वाघ, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मनोहर लोलगे, युवासेनेचे सचिन पाटील, रवी भिलवंडे, गजानन हरकरे, दिलीप बघेल, ईश्वर सूर्यवंशी, माधवराव कल्याणकर, विजय कल्याणकर, विनोद काकडे, पुरभाजी जाधव, सुरेश पावडे, नवनाथ जोगदंड, गणेश पेन्सलवार, प्रभाकर वानेगावकर, पांचाळ व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.