
नांदुरीच्या सप्तशृंगी आनंदाश्रमात सध्या लगीनघाई सुरू आहे, ती 83 वर्षीय आजी व 85 वर्षांच्या आजोबांची पुन्हा लग्नगाठ बांधण्यासाठी. 1944 मध्ये त्यांचा बालविवाह झाला, तेव्हा ना हळद लागली, ना वाजंत्री वाजली. पुढे आयुष्यभर ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या एकुलत्या एका मुलानेच म्हातारपणी घराबाहेर काढले, असे केविलवाणे जगणे नशिबी आलेल्या या दाम्पत्याला चार क्षण आनंदाचे मिळावेत म्हणून मायेने जोडलेली शेकडो माणसे पुढे आली आहेत. 81 वर्षांनी पुन्हा विवाह होईल, मंगलाष्टके गायली जातील, असा विचारही कधी त्यांनी केला नव्हता. मात्र हे रविवारी, 18 मे रोजी घडणार आहे.
देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील चार वर्षांच्या संतोषचा मामाची मुलगी कळवण तालुक्यातील निवाणेतील अवघ्या दोन वर्षांच्या जाईबाईबरोबर 1944 मध्ये बालविवाह झाला. आता हे संतोष बाबा 85 वर्षांचे, तर त्यांच्या पत्नी जाईबाई 83 वर्षांच्या आहेत. एकमेकांच्या सोबतीने त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, एकुलत्या एका मुलाला जिवापाड जपले. म्हातारपणी तो आधार झाला नाही, लग्न होताच त्याने आई-वडिलांना बेघर केले. कधी मंदिरात तर कधी फुटपाथवर राहून हे जोडपे आला दिवस ढकलत होते. त्यांना कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी आनंदआश्रमाने आधार दिला. दीड वर्षांपासून ते या आश्रमातच राहत आहेत.
घरची परिस्थिती चांगली असूनही मुलाने कधी साधी विचारपूसही केली नाही. त्यांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे यावेत, बालविवाहामुळे कधीही न अनुभवलेल्या लग्न सोहळ्यातील सर्व विधींचा आनंद घेता यावा म्हणून आश्रमाचे संचालक गंगा पगार यांनी त्यांचा पुन्हा विवाह लावण्याचे ठरवले. यामुळे सध्या आश्रमात लगीनघाई सुरू आहे. येथील आबालवृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मांडव, हळद, मंगलाष्टकांसह सर्व विधीची तयारी सुरू आहे. या लग्नात वाजंत्री वाजेल, अन्नदान केले जाईल, रथातून मिरवणूक निघणार असल्याने हा विवाहसोहळा काwतुकाचा विषय ठरला आहे. ‘आमच्या आजी-आजोबांच्या लग्नाला यायचे हं’, असं पेमानं आमंत्रण देणारी नातवंडांची पत्रिका लक्ष वेधून घेत आहे.
सर्वकाही त्यांच्या आनंदासाठीच
या निराधार वयोवृद्ध दाम्पत्यास व आनंदाश्रमातील इतर आबालवृद्धांना आनंद मिळावा, हा हेतू या विवाहामागे आहे. महाराष्ट्रात कधी झाला नाही, असा आगळावेगळा पुनर्विवाहाचा हा सोहळा आम्ही करू, अशी प्रतिक्रिया सप्तशृंगी आनंदआश्रमाचे संचालक गंगा पगार यांनी दिली.