जहांगीर कलादालनात डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांचे चित्रप्रदर्शन

207

खरे जग आपल्या अंतर्मनात सामावलेले आहे. अंतर्मनाच्या सर्वच पातळ्यांवरती आपण जेव्हा सर्व विकारांपासून अलिप्त होऊन संचार करतो तेव्हा आपण आतल्या आत वितळत, विरघळत असतो. ही ईश्वराच्या जवळ जाण्याची, स्वतःचा शोध घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात असते. हाच प्रवास दर्शवणारे  डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांचे चित्र प्रदर्शन आजपासून जहांगीर कलादालनात सुरू झाले आहे. हे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 22 ते 28 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

‘इन टू द डिव्हाईन ः द जर्नी ऑफ मेलटिंग विदिन’ असे शीर्षक असलेल्या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती सांगताना डॉ. नरेंद्र बोरलेपवार म्हणाले, अनेक भ्रामक, खोटय़ा समजुतीने आपण जीवन जगत असतो. वयाच्या एका टप्प्यावर पुरेसा अनुभव गाठीशी आल्यावर हेच सारे फोल वाटू लागते. आपण आपल्या आतमध्ये बघायला शिकतो. आपला अहंभाव वितळू लागतो. ही आतमध्ये वितळण्याची, विरघळण्याची सुरुवात असते. वयाच्या चाळिशीत मी हा अनुभव घेत आहे. त्या भावनांना मी कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पिघल पिघलकर इतना पिघलू, मै शून्य हो जाऊ, जिस ईश्वर ने मुझे बनाया, उसमे बस जाऊ,’ असा हा प्रवास आहे.

प्रदर्शनात  डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी साकारलेली ऍक्रेलिक कलर विथ मोल्डिंग पेस्ट या माध्यमातील चित्रे आणि त्यांच्या भावनांना शब्दरूप मिळालेल्या कविता आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेता चंकी पांडे याच्या हस्ते झाले.

डॉ.  बोरलेपवार हे जाहिरात व कला क्षेत्रातील नावाजलेले नाव. सोरा मीडिया या जाहिरात संस्थेचे संस्थापक आहेत. बोरलेपवार यांनी अनेक एकल आणि समूह चित्र प्रदर्शनातून आपली कला प्रदर्शित केली आहे.

‘26/11’ रोजी जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या  पार्श्वभूमीवर त्यांनी ‘डू ऑर डाय आर्ट अगेंस्ट टेररिझम’ या चित्र मालिकेतून आपली संवेदना प्रकट केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या