पंतप्रधान मोदी घाबरलेत… राहुल गांधी यांचे टिकास्त्र, LPG च्या मुद्द्यावरून संसदेच्या आवारात विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर ऊर्जेचे मोठे संकट घोंघावत आहे. हिंदुस्थानमध्येही एलपीजी सिलेंडरचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागल्या आहेत. याचे पडसाद गुरुवारी संसदेमध्येही उमटले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत चर्चेची मागणी केली. तसेच संसदेच्या बाहेर प्रतिकात्मक गॅस सिलेंडर, चूल घेऊन खासदारांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलनही केले. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांवर खरपूस टीका केली.

आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तेल, एलपीजीच्या पुरवठ्यावर होत आहे आणि त्यामुळेच देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचेही दिसले. तर काही ठिकाणी थेट पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सिलेंडरचे वाटप करावे लागले. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत संसद परिसर दणाणून सोडला.

याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र ते स्वत:च वेगळ्या कारणांमुळे घाबरलेले आहेत. अदानी प्रकरण आणि एपस्टीन फाईल प्रकरणामुळे मोदी घाबरले आहेत. त्यामुळेच ते सभागृहामध्ये येत नाहीत. कारही संसदेत पंतप्रधानांची खुर्ची रिकामी होती.