
‘आसाममध्ये डबल इंजिन सरकार चालवण्याच्या बाता पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मारत होते, प्रत्यक्षात त्यांनी डबल गुलामीचे सरकार आणले. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे गुलाम झाले आहेत आणि हिमंता बिस्वा सरमा हे मोदींचे गुलाम आहेत. असे हे डबल गुलामी सरकार आहे,’ अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या-खासदार प्रियांका गांधी यांनी आज केली.
आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाझिरा येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. प्रियांका गांधी यांनी यावेळी मोदी व सरमा यांना लक्ष्य केले. ‘नरेंद्र मोदी यांच्या नीती-धोरणांमुळे आज संपूर्ण देश संकटात सापडला आहे. हे मोदी आसामच्या जनतेकडे मते मागत आहेत. आसामला गुलाम बनवण्यासाठी, दडपून टाकण्यासाठी यांना मते हवी आहेत. अशा वेळी जनतेने सावध व्हायला हवे. आपल्याला सर्वांना मिळून एक नवीन आसाम बनवायचा आहे. भ्रष्टाचार संपवणारा, तरुणांना रोजगार देणारा आणि सर्वांना सुखी ठेवणारा आसाम बनवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी उभे राहा,’ असे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले.
आसाममध्ये सरकारी संपत्तीचा गैरवापर
‘आसाममधील भाजपच्या सरकारला जनता त्रासली आहे. हे भ्रष्टाचाऱयांचे आणि माफियांचे सरकार आहे हे लोकांना कळून चुकले आहे. एक कुटुंब अख्ख्या राज्याला लुटत आहे. सार्वजनिक संपत्तीचा गैरवापर केला जात आहे. आसामी जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजपने पूर्ण केलेले नाही. त्यामळे लोकांना काँग्रेसबद्दल आशा वाटू लागली आहे,’ असे प्रियांका म्हणाल्या.

























































