लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला सर्वाधिक 293 जागा मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर उद्या ते सलग तिसऱ्यांदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या दिमाखदार शपथविधी सोहळय़ासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या सायंकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान मोदी यांना शपथ देतील. या सोहळय़ासाठी तब्बल आठ हजार प्रतिष्ठत देशविदेशातील पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवर विजय मिळाला आहे. तर इंडिया आघाडीला 232 जागांवर विजय मिळाला आहे. ‘एनडीए’ला सर्वाधिक 293 जागा मिळाल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकार बनवण्यासाठी ‘एनडीए’ला आमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवनिर्वाचित खासदारांच्या उपस्थितीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने ‘एनडीए’चे संसदीय नेते म्हणून निवड करण्यात आली. या शपथविधी सोहळय़ासाठी मित्रराष्ट्रांच्या प्रमुखांना सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे आदींचा समावेश आहे. या सोहळय़ानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून स्नेहभोजनाची मेजवानीदेखील पाहुण्यांना दिली जाणार आहे.
…तर ‘इंडिया’चीही सोहळय़ाला उपस्थिती
लोकसभा निवडणूक अटीतटीची झाल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीचे नेते, खासदार या सोहळय़ासाठी उपस्थित राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आमंत्रण आल्यास या सोहळय़ासाठी ‘इंडिया’ आघाडीही उपस्थित राहील, अशी प्रतिक्रिया काँगेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.
दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था
मोदींच्या शपथविधी सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून 10 जूनपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून जागोजागी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. सोहळय़ासाठी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था केलेल्या हॉटेल्समध्येही चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. एसजीपी, दिल्ली पोलीस, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, गुप्तचर विभागाचे पथक, निमलष्करी दल, एनएसजी आणि एनडीआरएफचे पथकही सज्ज राहणार आहे.