
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) चे अंतराळवीर आणि शास्त्रज्ञ दिल्लीतील ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (GLEX-2025) मध्ये उपस्थित नव्हते. यामागे काय कारण असेल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. याबद्दल काही अंदाज देखील वर्तवण्यात आले आहेत. यापैकी एक अंदाज असा आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात NASA च्या बजेटमध्ये झालेली मोठी कपात त्यांच्या अनुपस्थिचे महत्त्वाचे कारण असू शकेल.
अंतराळ संशोधन परिषदेत 37 देशांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होत आहेत परंतु अमेरिकन प्रशासनाने अंतराळ संस्थेच्या बजेटमध्ये 24.3 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्या अनुपस्थितीचे तेच एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, NASA आणि एलोन मस्कच्या स्पेसएक्समधील (Space X) यांच्यातील संघर्ष देखील यामागील एक कारण असण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की नासाच्या निधी कपातीदरम्यान, अनेक अंतराळ करार स्पेसएक्सकडे जातील अशी भीती आहे.
एलॉन मस्क हे ट्रम्पच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक आहेत आणि सरकारी कार्यक्षमता विभागासाठीच्या खर्च कपाती संदर्भात ते आग्रही आहेत. ट्रम्प यांनी NASA चे नेतृत्व करण्यासाठी निवडलेले टेक अब्जाधीश जेरेड इसाकमन यांनी स्पेसएक्ससोबत दोनदा अंतराळात उड्डाण केले आहे. ज्यामुळे दोन संस्थांमधील संघर्षांबद्दल आणखी चिंता निर्माण झाली आहे.
सॅटकॉम ऑपरेटर्ससाठी नवीन राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास कंपनीने सहमती दर्शविल्यानंतर दूरसंचार विभाग (डीओटी) कडून लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) मिळाल्यानंतर, मस्कची परवडणारी इंटरनेट सेवा स्टारलिंक हिंदुस्थानात प्रक्षेपित होण्याच्या जवळ आली असताना या परिषदेत NASA ची अनुपस्थिती अनेकांना जाणवत आहे.
अमेरिकन अंतराळ संस्थेच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संघटनेचे (ISRO) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी अंतराळ संस्थांबद्दल भाष्य करण्यास नकार दिला.
जीएलईएक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले होते की हिंदुस्थान अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवीन आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि लवकरच हिंदुस्थानी अंतराळवीरांचे पाऊल चंद्रावर असेल. त्यांनी असेही सांगितले की, 2035 पर्यंत हिंदुस्थानी अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याव्यतिरिक्त, मंगळ आणि शुक्र हे देशाच्या शोध मोहिमांसाठी देखील अभ्यास सुरू आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संस्थांना सुव्यवस्थित करण्याचे निर्देश दिल्यानंतर मार्च महिन्यापासून NASA मध्ये कर्मचारी कपात आणि अनेक प्रमुख कार्यालये बंद करण्यास सुरुवात झाली.