गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे लांबले असून त्यांना पृथ्वीवर येण्यासाठी 2025 साल उजाडणार आहे.
नासाच्या अधिकाऱ्यांनी अपडेट दिली आहे. स्टारलायनरसोबत गेलेले अंतराळवीर यांना परत आणण्याची योजना बनवताना सर्व पर्यांयांचा विचार केल्याची माहिती त्यांनी गुरुवारी दिली. त्यापैकी एका पर्यायाच्या माध्यमातून दोन्ही अंतराळवीर 2025 मध्ये पृथ्वीवर परतू शकतात. या योजनेमध्ये बोईंगची प्रतिस्पर्धी स्पेसएक्सही सहभागी आहे. स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये अडकलेले सुनिता आणि बुच यांना पृथ्वीवर सुखरूप परत आणणे हा नासाचा मुख्य उद्देश आहे, असे कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टीच म्हणाले.
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स सोबत मिळून काम करत आहे. ते क्रू 9 ला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. याची खात्री करण्यासाठी आम्ही स्पेसएक्ससोबत काम करत आहोत. गरज पडल्यास बुच आणि सुनीता विल्यम्सला क्रू 9 मध्ये परत पाठवतील, असे स्टीच यांनी सांगितले. नासाने स्पेसएक्स क्रू 9 मोहिमेत विलंब झाल्याची माहिती मंगळवारी दिली. आणि त्याचे प्रक्षेपण 25 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. यापूर्वी ते ऑगस्टमध्ये पाठवले जाणार होते. ते चार क्रू सदस्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन जाईल.
क्रू 9 च्या लॉन्चचा उल्लेख करत नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते स्टारलायनरच्या अंतराळात अडकलेल्या दोन अंतराळवीरांना परत आणण्याची योजना आखत आहेत. त्यांचे लक्ष्य 2025 पर्यंत सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणायचे आहे. ते म्हणाले की, आम्ही क्रू 9 साठी ड्रॅगन सेट केला आहे. त्या फ्लाइटमध्ये फक्त दोन प्रवासी उड्डाण करतात आणि त्यानंतर आम्ही फेब्रुवारी 2025 मध्ये चार क्रू सदस्यांना परत आणू शकतो. ते दोन यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर असतील. पुढे ते म्हणाले की, आतापर्यंत या योजनेला मंजुरी दिलेली नाही. बोईंगचे स्टारलायनर अंतराळ यान 5 जूनला सुनिता विल्य्म्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अंतराळात गेले होते. तिथे ते एक आठवडा राहून जूनच्या मध्यात परतणार होते. मात्र थ्रस्टर आणि हिलियम लीकेज झाल्याने त्यांना थांबावे लागले. अंतराळवीर आणि पृथ्वीवर उपस्थित असलेले इंजिनीअर हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणि अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परतण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.