मुलगा, मुलीची हत्या करुन पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

42

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिकरोड भागातील निसर्गदत्तनगर येथे सुनील बेलदार याने आपल्या चार वर्षीय मुलगा व सहा वर्षीय मुलीची दोरीने गळा आवळून हत्या केली, तर तिसऱ्या बारा वर्षीय मुलीला विषारी औषध व इंजेक्शन देऊन तिच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीसह पित्याची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकरोडच्या बिटको कॉलेजमागील जगताप मळा परिसरातील निसर्गदत्तनगर येथे बेलदार कुटुंब राहते. सुनील निवृत्ती बेलदार (५०) याचा पत्नीशी वाद असल्याने ती गेल्या दोन वर्षांपासून माहेरी शिरपूर येथे राहत होती. बुधवारी त्याने समजूत काढून तिला नाशिकमध्ये आणले. आज दुपारी मुलांसह हॉटेलात जेवण केल्यानंतर ते घरी परतले. घरातील एका खोलीत सुनील मुलांसह झोपला होता. दुपारी अडीचच्या सुमारास त्याने चार वर्षीय मुलगा देवराज, सहा वर्षीय मुलगी वैष्णवी यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. यानंतर बारा वर्षीय संजिवनीला विषारी औषध व इंजेक्शन दिले.

बाहेरील हॉलमध्ये असलेल्या पत्नीने घराबाहेर जाऊन आरडाओरड करीत शेजाऱ्यांना बोलविले. शेजारी येताच सुनीलने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यात तो गंभीर जखमी झाला असून, तो व बारावर्षीय संजिवनी यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती-पत्नीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या