
रायगडमध्ये एक जागा असताना पालकमंत्री पदाचा आग्रह धरता. नाशिकमध्ये सर्वाधिक सात आमदार असल्याने इथला पालकमंत्री होण्यासाठी आग्रह धरा, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच गटाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांना सुनावले आहे.
मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, असे जाहीर विधान मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे येथे केले. यामुळे या पालकमंत्री पदावर दावा ठोकणारे मंत्री छगन भुजबळ हेही सावध झाले. त्यांनी स्वतःच्या गटातील निर्णय घेणाऱ्या प्रमुखांनाच सुनावले. रायगडमध्ये एक आमदार असताना पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो. नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजे सात आमदार असल्याने आपल्याच गटाचा पालकमंत्री होण्यासाठी आमच्या लोकांनी आग्रह धरावा, असा सल्ला देत त्यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांची कानउघाडणी केली. पालकमंत्री पदाचा निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात, असे सांगून अजित पवार यांनी भुजबळ यांचे म्हणणे टोलवून लावले. भाजपाकडून घेतल्या जात असलेल्या एकतर्फी निर्णयापुढे अजित पवार गट हतबल झाला असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.