नाशिक : मोबाईल रेंजअभावी ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय, तणावाखाली विद्यार्थ्याची आत्महत्या

546

सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम अशा बुबळी गावात रविवारी पहाटे बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोबाईलला रेंज नसल्याने ऑनलाईन अभ्यासात व्यत्यय येत असल्याच्या तणावातून आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुबळी येथील बाबुराव पवार व पत्नी दोघेही शिक्षक आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा विपुल (17) हा नगर जिह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होता. त्याने रविवारी पहाटेच्या सुमारास बुबळी येथील राहत्या घराजवळील शेवग्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या शाळा व महाविद्यालये बंद असल्याने तो घरातूनच ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शिक्षण घेत होता. मात्र,गावात पुरेसे मोबाईलचे नेटवर्क नसल्याने अभ्यासात व्यत्यय येत होता. यामुळे विपुलने गळफास घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बुबळीचे पोलीस पाटील सखाराम चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून सुरगाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्याच्या आत्महत्येमागील निश्चित कारणाचा शोध सुरू आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक डी. व्ही. वसावे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या