नाशिक : निसर्गरम्य त्र्यंबकेश्वर, इगतपुरीला दुधाळ धबधब्यांची प्रतिक्षा,श्रावणसरी देखील बरसेना

771

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुके हे हिरवाईने सजलेल्या डोंगररांगा, रानमाळ आणि अनेक दुधाळ धबधब्यांमुळे पावसाळी पर्यटनाचे केंद्र ठरले आहेत. मात्र, यंदा श्रावणाचे दोन आठवडे उलटूनही दमदार पाऊस झालेला नसल्याने निसर्ग सौंदर्य खुलवणार्या दुधाळ धबधब्यांचे दर्शन घडलेले नाही. त्यामुळे स्थानिकांसह सर्वच निसर्गप्रेमी दरवर्षीप्रमाणे कोसळणाऱ्या धबधब्यांची प्रतिक्षा करीत आहेत.

कसारा घाटाचे पावसाळ्यातील देखणे रूप पर्यटकांसाठी कायमच पर्वणी राहिली आहे. इगतपुरी तालुक्यातील अशोका धबधबा, भावली, दारणा, वाकी धरण परिसर, कावनई हे देखील आकर्षणाचे केंद्र असते. इगतपुरी-घोटी मार्गावरील त्र्यंबकेश्वरजवळील पहिने परिसरातील डोंगररांगांवरून कोसळणारे असंख्य धबधबे, हिरवाईतून जाणारा नागमोडी रस्ता, वाऱ्यावर डोलणारी शेतांमधील भात रोपे, दुथडी भरून वाहणारे नद्या-नाले हे सौंदर्य अप्रतिम असते. त्याचबरोबर सापगाव आणि दुगारवाडीचा धबधबा, तेथून पुढे जव्हारचा घाट हा परिसरही निसर्गप्रेमींच्या गर्दीने दरवर्षी जुलैपासूनच फुललेला असतो. यंदा जूनच्या पहिल्या आठवडयानंतर म्हणावा तसा दमदार पाऊस झालेला नाही. डोंगररांगांवर हिरवाईचा साज चढला असला तरीही नद्या-नाले, ओहोळ, तसेच पर्वतराज ब्रह्मगिरीसह डोंगररांगांवरून प्रचंड वेगाने कोसळणारे धबधबे अजूनही कोरडेच आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमींना दरवर्षीच्या त्या निसर्गसौंदर्याची प्रतिक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या