इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नेतान्याहू बंकरकडे धावले? जाणून घ्या काय आहे सत्य

 

लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईसंबंधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणला मध्ये न पडण्याचा इशारा दिला होता. परंतु, इराणने त्याकडे दुर्लक्ष करत मंगळवारी रात्री तब्बल 400 क्षेपणास्त्रे डागली. तसेच इस्रायलच्या जाफा येथे गोळीबारीच्याही घटना घडल्या. या घटनेत 3 जण मारले गेले. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे शेल्टरच्या दिशेने धावताना दिसत आहे, असा दावा सध्या या व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर केला जात आहे. कोणीतरी कृपया बेंजामिन नेतन्याहू यांना लपण्यासाठी जागा द्या. ते पळून गेले आहेत, लपत आहेत, स्वतःचा बचाव करण्यासाठी पळून जात आहेत अशा कमेंट त्या व्हिडीओवर केल्या जात आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला कथित व्हिडिओ किमान तीन वर्षे जुना आहे. या व्हिडिओची चौकशी केली असता तो 2021 मध्ये फेसबुकवर पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये बेंजामिन नेतन्याहू इस्रायली संसदेच्या कॉरिडॉरमधून फिरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 14 डिसेंबर 2021 रोजी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.