कश्मिरमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग बंद, खोऱ्याचा देशाशी संपर्क तुटला

यंदाच्या पावसाळ्यात जम्मू आणि कश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. ढगफुटी आणि भूस्खलनासह एकामागून एक अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. भूस्खलन आणि पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचे काही भाग आणि इतर रस्ते वाहून गेल्याने कश्मिर खोरे देशाच्या उर्वरित भागापासून तुटले आहे. २६ ऑगस्टपासून महामार्ग आणि इतर आंतरराज्य रस्ते बंद झाल्यामुळे, कठुआ ते कश्मिरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ३,५०० हून अधिक वाहने अडकली आहेत.

सोमवारी (१ सप्टेंबर) अडकलेल्या वाहनांच्या वाहतुकीसाठी महामार्ग अंशतः खुला करण्यात आला. याशिवाय, भूस्खलन आणि रस्ते वाहून गेल्यामुळे जम्मू-राजौरी-पूंछ महामार्ग आणि बटोटे-डोडा-किश्तवार महामार्गासह इतर महत्त्वाचे मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद आहेत. जम्मू रेल्वे विभागातील रेल्वे वाहतूक गेल्या ९ दिवसांपासून बंद आहे. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे पठाणकोट-जम्मू विभागात अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर मातीचा ढिगारा कोसळला आहे. सततच्या पावसामुळे जम्मू प्रदेशात विशेषतः यात्रेकरू अडकले आहेत आणि रेल्वे आणि रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात ३४ जणांचा मृत्यू झाला.

२०१४ च्या पुरानंतर यावेळी पुन्हा बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना जम्मू आणि कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मागील सरकारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कश्मिर खोऱ्यातील पूर रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.