सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, चुंगथांगमध्ये 200 पर्यटक अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, यामुळे चुंगथांगमध्ये सुमारे 200 पर्यटक अडकल्याचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी सांगितले. गंगटोकला लाचेनशी आणि चुंगथांगला लाचेनशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर भूस्खलन झाल्यामुळे लाचेनला जाणारे पर्यटक चुंगथांगमध्ये अडकून पडले आहेत.

भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांची आयटीबीपी कॅम्प आणि गुरुद्वारात राहण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे लाचेनकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर प्रवासाला परवानगी दिली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

लाचुंगकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात आला असून, पर्यटकांना सुरक्षितपणे गंगटोकला परत आणण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पाकयोंग, गंगटोक आणि मंगन जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला होता.

सिक्कीम हे ईशान्य हिमालयातील कांचनजंगा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले एक छोटे आणि सुंदर राज्य आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. निसर्गप्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने लोक येथे आले होते आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत.